राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे जिल्हाउपाध्यक्ष विनोद तराळ लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तराळ यांना गलाला लावल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील यंनीदेखील या पक्षप्रवेशाला दुजोरा दिला आहे.
विनोद तराळ यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शरद पवार यांच्यासह एकनाथ खडसे यांच्यासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. विनोद तराळ हे मुक्ताईनगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माफदा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष असून सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तराळ हे शरद पवार यांच्यासोबत राहिले, मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे जळगावच्या स्थानिक राजकारणातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विनोद तराळ यांच्यासोबत काही माजी व सध्याचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विकासोचे पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या पक्षांतरामुळे अंतुर्ली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या प्रभावाला मोठा धक्का बसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विशेषतः आमदार एकनाथराव खडसे यांना याचा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे आमदार चंद्रकांत पाटील यांची राजकीय स्थिती अधिक बळकट होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातूनच शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे विनोद तराळ शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरच्या राजकारणाला नव्याने कलाटणी मिळणार असून आगामी स्थानिक राजकारणावर या घडामोडींचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे बरेचजण आमच्या सोबत येत आहेत. त्यात विनोद तराळ हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह लवकरच शिवसेनेत सहभागी होणार आहेत. यासाठी लवकरच मुहूर्त ठरवला जाईल,” अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. या घडामोडींमुळे मुक्ताईनगर व आसपासच्या भागातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता असून, शिंदे गट अधिक आक्रमक रणनीतीसह स्थानिक निवडणुकांत उतरू शकतो.
Leave a Reply