पुणे: सध्या महाराष्ट्रात राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागलेत. उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार या चर्चा सुरू असतानाच, दुरावलेले पवार काका-पुतणे देखील एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे आणि हाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला असता त्यांनी फार सूचक उत्तर दिलं आहे.
10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. मात्र त्याआधी आज अजित पवार आणि शरद पवार हे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी एकाच मंचावर आले, त्याचवेळी त्यांच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एआय तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यक्रमासाठी स्टेजवरील बैठकव्यवस्था अजित पवारांनी पुन्हा बदलली. व्हीएसआयच्या व्यवस्थापनाने स्टेजवर शरद पवारांच्या शेजारी अजित पवारांची बैठक व्यवस्था केली होती. मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी असलेली त्यांची नेमप्लेट उचलली आणि तिथे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची नेमप्लेट सरकवली. त्यामुळे शरद पवारांच्या शेजारी अजित पवारांऐवजी बाबासाहेब पाटील बसले आणि अजित पवार त्यांच्या डाव्या बाजुला बसले. दरम्यान या अजित पवारांच्या कृतीची चर्चा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या(मंगळवारी,ता 10) वर्धापनदिन आहे. दरम्यान वर्धापानदिनाच्या एक दिवस आधी आज(सोमवारी,ता 9) शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर आले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत इतरही नेते उपस्थित आहेत. राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका, साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन उद्या (10 जूनला) सकाळी 10.10 वाजता शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन, येथे ध्वजारोहण होणार आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे पक्षाचा मेळावा सकाळी 10.30 ते 1.10 या वेळेत होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 26 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे शहराला वर्धापनदिनाच्या यजमान पदाचा मान मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात साजरा होत असलेला हा वर्धापनदिन पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा, ताकद देणारा ठरेल हा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन देखील उद्या पुण्यात पार पडणार आहे.
Leave a Reply