पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यात भारत आणि ब्रिटन दरम्यान एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली असून, यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक बळकट होणार आहेत.
या करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील वस्तू आणि सेवांचा व्यापार पूर्वीपेक्षा अधिक सोपा आणि किफायतशीर होईल. विशेष म्हणजे, भारतात परदेशी वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, तर भारतीय वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
नवीन करारानंतर डाळी, तांदूळ, मसाले, सुकामेवा यांसारख्या अन्नपदार्थांचा व्यापार सुलभ होणार असून, ब्रिटनमध्ये अशा वस्तूंना अधिक मागणी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय दारू आणि बिअरसारख्या उत्पादनांवरील आयात करातही लक्षणीय कपात केली जाणार आहे. पूर्वी भारतातून दारू पाठवण्यावर सुमारे 150 टक्के कर आकारला जात होता, तो आता कमी करण्यात येईल.
करारामुळे केवळ अन्नपदार्थच नव्हे तर वाहने, कपडे आणि तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तूंमध्येही स्वस्ताई अनुभवायला मिळू शकते. यामुळे दोन्ही देशांमध्ये रोजगार निर्मितीलाही चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हा करार ब्रिटनच्या संसदेत सादर करण्यात येणार असून, तिथे मंजुरी मिळाल्यानंतर काही महिन्यांत प्रत्यक्ष अंमलात येईल. अंदाजानुसार, 2030 पर्यंत भारत-ब्रिटनमधील परस्पर व्यापार दुप्पट होऊन 120 अब्ज डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचू शकतो.
या ऐतिहासिक कराराचे व्यापारी वर्ग आणि तज्ज्ञांकडून सकारात्मक स्वागत करण्यात आले असून, भारताच्या जागतिक व्यापारात हा एक मोठा पाऊल ठरणार आहे.
भारत-ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, व्यापार होणार अधिक सुलभ आणि परदेशी वस्तूंमध्ये स्वस्ताई.

Leave a Reply