बत्तीस शिराळ्यात साजरी केली जाणारी नागपंचमी ही भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि जागतिक लक्ष वेधून घेणारी परंपरा आहे. १९५३ साली नागपंचमी कशी साजरी केली जाते, याची माहिती कै. दत्ताजी पोटे आणि इतर सहकाऱ्यांनी प्रसिद्ध लेखक व छायाचित्रकार मुकुंदराव किर्लोस्कर यांच्याकडे दिली. त्यानंतर १९५४ च्या किर्लोस्कर मासिकात याविषयी लेख प्रसिद्ध झाला. या चित्रफितीचे अमेरिकेत प्रदर्शन करण्यात आले आणि नंतर नॅशनल जिओग्राफिकने शिराळ्यात येऊन याला जागतिक पातळीवर प्रसिद्धी दिली. त्यामुळे नागपंचमीची ही खास परंपरा जगभर चर्चेत आली.
या सणाचा इतिहास दहाव्या-अकराव्या शतकातल्या महायोगी गोरक्षनाथ महाराजांपासून सुरू होतो. तेव्हा ते शिराळ्यात लोकांचे प्रबोधन करत असत. श्रावण शुद्ध पंचमीला भीक्षा मागण्यासाठी एका महाजनांच्या घरी गेले असता, तिथे एका गृहिणीने मातीच्या नागाची पूजा करताना त्यांना नागपूजेचं कारण सांगितलं. गोरक्षनाथांनी विचारलं की मातीच्या नागाची पूजा करता, तर जिवंत नागाची का नाही? त्यानंतर तिथे जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली.
या दिवशी भाविक भगिनी नागाला आपला भाऊ मानतात. त्याचा उपवास करतात आणि तो सूक्ष्म रूपाने घरी येईल, ही भावना मनाशी धरतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाकात चिरणे, तळणे वर्ज्य मानले जाते.
पूर्वी नागपंचमीच्या दिवशी अंबामाता मंदिर परिसरातील मोठ्या वडाच्या झाडाखाली गर्दी होत असे. बैलगाडीतून नागांची मिरवणूक निघायची. पण २००२ पासून न्यायालयाने जिवंत नागपुजेवर बंदी घातल्याने आता नागप्रतिमेची पूजा करून मिरवणूक काढली जाते. पूर्वी अंबामाता मंदिरात पूजा करून नंतर घरोघरी पूजा करून ट्रॅक्टरवरून नाग मिरवणूक काढली जात होती.
कायद्याची बंधने आल्यावरही शिराळकरांनी उत्साहात हा सण साजरा करत परंपरा व धार्मिकता जपली आहे. आजही नागपंचमीला शिराळ्यात विशेष महत्त्व आहे. पद्धतीत बदल झाले असले तरी तरुणाईमध्ये सणाचा उत्साह टिकून आहे. ही परंपरा आजही लोकोत्सव म्हणून जपली जाते.
बत्तीस शिराळा’ची नागपंचमी – परंपरेपासून जागतिक प्रसिद्धीपर्यंतचा प्रवास….

Leave a Reply