इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत शुभमन गिलची बॅट धडाडून चालली असतानाच, त्याच्या खासगी आयुष्यातील एक गोष्ट चर्चेत आली आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यात गिल, अंजली तेंडुलकर आणि रवींद्र जडेजा दिसत आहेत. विशेष म्हणजे या दृश्यावरून जडेजाने गिलला मिश्कील टोमणा मारल्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
लीड्स आणि एजबॅस्टन कसोटीनंतर संपूर्ण भारतीय संघ युवराज सिंगच्या एका चॅरिटी कार्यक्रमाला उपस्थित होता. याच कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आपल्या पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसोबत आला होता. शुभमन गिल आणि सारा एका कार्यक्रमात एकत्र उपस्थित असल्याचं समोर येताच, नेटकऱ्यांनी जुन्या चर्चांना पुन्हा उजाळा दिला.
व्हायरल व्हिडीओमध्ये के.एल. राहुल, रवींद्र जडेजा आणि गिल एकाच टेबलावर बसलेले दिसतात. कॅमेरा जसजसा अंजली तेंडुलकरकडे वळतो, तसतशी गर्दीत टाळ्यांचा आवाज वाढतो. त्याचवेळी जडेजा मिश्किल हावभाव करत गिलकडे पाहतो आणि त्याला छेडतो. राहुल खळखळून हसतो आणि ऋषभ पंतही हसत जडेजाच्या पाठीवर टपली मारतो.
याच कार्यक्रमातला दुसरा व्हिडीओ अधिक गाजतो आहे. त्यात शुभमन गिल आत प्रवेश करतो आणि सारा त्याच्याकडे पाहते, मात्र गिल कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे निघून जातो. दुसऱ्या क्लिपमध्ये सारा टीम इंडियाचा ग्रुप व्हिडीओ शूट करताना दिसते. हे सगळं पाहून चाहत्यांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. सध्या ते दोघं “फक्त चांगले मित्र” असल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत पुष्टी झालेली नाही.
गिलने लीड्स आणि एजबॅस्टन कसोटीत दोन शतके आणि एक द्विशतक ठोकून कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. आता लॉर्ड्स कसोटीत विजय मिळवल्यास भारत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेऊ शकतो. एकंदरित, मैदानावरची त्याची खेळी जितकी रंगतदार आहे, तितकीच रंगत त्याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती फिरणाऱ्या चर्चांनाही आली आहे. जडेजाच्या मिश्किलपणामुळे संघातील मस्ती आणि एकमेकांतील गट्टी चाहत्यांपर्यंत पोहोचताना दिसते आहे.