गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच, गणरायाच्या स्वागतासाठी आरास कशी असावी यासाठी अनेक जण कल्पनांचे आभाळच रंगवत आहेत. काही मंडळांनी सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा पर्याय निवडलेला असला, तरी हा पर्याय आता वापरता येणार नाही. कारण, राज्यात प्लास्टिक व कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत केली आहे.
राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार महेश शिंदे यांनी औचित्याच्या मुद्यावरून राज्यात कृत्रिम फुलांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. खऱ्या फुलांच्या बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं.
फुलशेती संकटात सापडल्यास त्याचा परिणाम मध उत्पादनावरही होऊ शकतो, असंही यावेळी सांगण्यात आलं. याच मुद्द्यावरून फूल उत्पादक शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गोगावले यांनी दिली.
लवकरच या बंदीबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हल्ली अनेक कार्यक्रम, विवाहसमारंभ, मंदिरे, उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम फुलांचा वापर होत आहे. यामुळे २० ते २५ टक्के फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, त्यांचा सुमारे अडीच ते तीन हजार कोटींचा व्यवसाय धोक्यात आला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येणारी ही कृत्रिम फुलांची विक्री थांबवण्याची मागणी आता अधिकच तीव्र होत चालली आहे..