कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी शहर अंमली पदार्थांचे केंद्र बनते आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी मोठी घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘मिशन झिरो ड्रग्ज’ मोहिमेअंतर्गत शाहूवाडी पोलिसांनी इचलकरंजी परिसरात मोठी कारवाई करत १३४.०४ ग्रॅम ‘एमडी’ म्हणजेच मेफेड्रॉन जप्त केले असून, याची अंदाजे किंमत ६ लाख ७३ हजार २०० रुपये एवढी आहे.
ही कारवाई कोरोची गाव हद्दीतील साईनाथ वजन् काट्यावर १८ जुलै रोजी रात्री ११.१६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी ऋषभ राजू खशात (वय ३०, रा. लोकमान्य नगर, कोरोची) हा विक्रीसाठी एमडी ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस नाईक सतीश लक्ष्मण कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचत आरोपीला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १३४.०४ ग्रॅम मेफेड्रॉन, २,५०० रुपये रोख आणि ५०० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.
यापूर्वी देखील, आठवड्याभरापूर्वी शाहूवाडी पोलिसांनी मेफेड्रॉनसंबंधी आणखी एक मोठी कारवाई केली होती. प्रतिबंधित मेफेन्फेटामीन सल्फेट इंजेक्शन विकणाऱ्या टोळीवर छापा टाकत त्यांच्याकडून एकूण २,३६,९६४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सदर कारवाईत अटक करण्यात आलेले मुख्य संशयित संग्राम अशोकराव पाटील (वय २९, रा. श्रीपादनगर), सचिन सुनील मांदवकर (वय २५, रा. यशवंत कॉलनी), अभिषेक गोविंद भिसे (वय २५, रा. लालनगर, सर्व इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साठवे यांना मिळालेल्या माहितीनुसार संग्राम पाटील याच्यासाठी श्रीपादनगर भागात सापळा रचण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इचलकरंजीत अंमली पदार्थांचे प्रमाण वाढत चालले असून, ‘मिशन झिरो ड्रग्ज’ अंतर्गत अशा घटनांवर कठोरपणे कारवाई केली जात आहे.
Leave a Reply