शिरसाट यांच्या बंगल्यासमोर मध्यरात्री गोंधळ; एका तरुणाकडून दगडफेक

छत्रपती संभाजीनगरमधून एका खळबळजनक घटनेची माहिती समोर आली आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान राजकीय वातावरण तापले असतानाच, आता मंत्री संजय शिरसाट यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास गोंधळ घालण्यात आला.

सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने शिरसाट यांच्या निवासस्थानाजवळ येत जोरदार शिवीगाळ केली आणि दगडफेक करत परिसरात तणाव निर्माण केला. या तरुणाचे नाव सौरभ घुले असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, परिसरातील काही नागरिकांनी आणि सुरक्षारक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही त्याने अराजक वर्तन सुरूच ठेवले. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर घटनेमागील अचूक कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र एक मंत्री आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी निर्माण झालेली ही असुरक्षिततेची भावना निश्चितच चिंतेची बाब मानली जात आहे.