: मागील काही दिवसांपासून राज्यात थांबलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होत असून कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
गुरुवारी (ता. २४) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट अर्थात गंभीर पावसाचा इशारा मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांसाठी देण्यात आला आहे.
तसेच यलो अलर्ट (मध्यम पावसाचा इशारा) कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बुधवारी, गेल्या २४ तासांत मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील धरण परिसरांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली. तर विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्यापासून ते मध्यम पावसाची नोंद झाली.
राज्यात पावसाची शक्यता वाढण्यामागे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि ‘विपा’ चक्रीवादळाचे अवशेष कारणीभूत ठरत आहेत. परिणामी ईशान्य अरबी समुद्र, दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हवामानात मोठे बदल घडून येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रवास आणि इतर अत्यावश्यक कामांदरम्यान काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाचा इशारा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज व यलो अलर्ट…

Leave a Reply