महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे पडसाद आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) राजकारणावर स्पष्टपणे उमटताना दिसत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तासंघर्षाचे ढोल सध्या पासूनच वाजू लागले आहेत.
तथापि, निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होणार असली, तरी खरी लढत महायुती विरुद्ध महायुती अशा स्वरूपात रंगण्याची शक्यता आहे. कारण महाडिक गटाला एकाच वेळी हसन मुश्रीफ आणि पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी सतेज पाटील या दोघांविरुद्ध लढावे लागणार आहे.
गोकुळ दूध संघावर अनेक वर्षे महाडिक गटाची सत्ता होती. मात्र, चार वर्षांपूर्वी काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांच्या पॅनलने महाडिक गटाला दारुण पराभव दिला होता. तो पराभव महाडिक गटाला झोंबलेला होता. त्या वेळी पाटील आणि मुश्रीफ हे महाविकास आघाडीत मंत्री होते.
नंतर २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडून अजितदादा गट भाजपाच्या प्रभावाखाली गेला. यामुळे राज्याच्या राजकारणात झालेले बदल जिल्हास्तरावरही जाणवायला लागले.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यामुळे वातावरण तापले होते. त्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट हस्तक्षेप करत नवीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदावर निवड केली. यामुळे गोकुळ दूध संघ सध्या महायुतीच्या ताब्यात गेला असे स्पष्ट झाले.
मुश्रीफ हे सध्या महायुतीचे मंत्री आहेत, तर महाडिक गटाचे धनंजय महाडिक हे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक महायुतीच्या नावाने लढवली जाणार आहे. मात्र, नेतृत्वासाठी आता संघर्ष सुरू झाला आहे. कारण महाडिक गट पुन्हा एकदा गोकुळवर वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत आहे.
सध्या हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव अध्यक्ष आहेत. आगामी निवडणुकीसाठी संचालकांची संख्या २१ वरून २५ करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला गेला आहे. मात्र, शौमिका महाडिक यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. “सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झालेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावरूनच आता महाडिक विरुद्ध मुश्रीफ असा सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. मुश्रीफ गट आपले वर्चस्व टिकवू पाहत आहे, तर महाडिक गट पुन्हा सत्तेवर येण्याची ताकद लावत आहे.
महायुती अंतर्गत हा संघर्ष अधिक उग्र रूप धारण करू नये म्हणून वरिष्ठांनी हस्तक्षेप करून यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याची शक्यता आहे. मात्र, महाडिक गट आपला अध्यक्ष गोकुळवर आणू इच्छित असल्याने ते मुश्रीफ गटाचे वर्चस्व मान्य करणार नाहीत.
एकूणच, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाडिक विरुद्ध मुश्रीफ आणि महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी तिहेरी लढत रंगणार आहे. या सगळ्या घडामोडींवरून याला “वरून किर्तन, आतून राजकीय तमाशा” असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही!
Leave a Reply