मुख्यमंत्री फडणवीस पंधरा डिसेंबर रोजी इचलकरंजी. श्री.शंभूतीर्थाचे अनावरण.

इचलकरंजी –येथील के. एल. मलाबादे चौकात उभारण्यात आलेल्या श्री शंभूतीर्थच्या भव्य अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत . इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन तसेच पोलिस विभाग तयारीला वेग देत आहेत. दिनांक १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री शंभूतीर्थ अनावरणाचा मुख्य कार्यक्रम पार पडणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण असून सुरक्षा व्यवस्थेलाही अधिक बळ देण्यात येत आहे.

या अनुषंगाने नारायण मळा परिसरातील हॅलिपॅडची आखणी व पाहणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केली. त्यांच्यासोबत पोलिस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड उपस्थित होते. हेलीपॅडचे मोजमाप, सुरक्षा व्यवस्था, उतरणीची दिशा, वाहनतळाची जागा आदी बाबींचा दोन्ही विभागांनी सविस्तर आढावा घेतला.

महापालिका व पोलिस प्रशासनाने नवमहाराष्ट्र सुत गिरणीजवळील मैदान, यशोलक्ष्मी कार्यालयाजवळची जागा तसेच नारायण मळा येथील डी.के.टी.ई. शाळा परिसरातील तीन ठिकाणांचीही संयुक्त पाहणी केली. मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा, प्रवेशमार्ग, सुरक्षा कवच, अडथळे दूर करणे आणि लोकवर्गणी नियंत्रणाबाबत आवश्यक त्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

दरम्यान, पोलिस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड व वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी अनावरणस्थळी स्वतंत्र पाहणी करून वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. कार्यक्रमादिवशी शहरातील वाहतुकीवर ताण येऊ नये यासाठी पर्यायी मार्ग, वाहन पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षा तैनाती यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

या पाहणीदरम्यान महापालिका उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रवीण मोरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, गावभाग पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, वाहतूक निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्यासह महानगरपालिका अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा दौरा सुरळीत व भव्यतेने पार पडावा यासाठी महानगरपालिका व पोलिस प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात येत असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *