
इचलकरंजी – एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर सादर होणाऱ्या एकांकिका या आपल्या सर्वांच्या जाणिवा प्रगल्भ करण्याचे काम करतात. या एकांकिकेमधून माणूस आपल्यासमोर उलगडत जातो. सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारच्या विविध आशयाचं उत्तम दर्शन या स्पर्धेमधून होत असते. अशी ही स्पर्धा इचलकरंजीत गेली २६ वर्षे निष्ठेने आयोजित केली जाते, त्यामुळे ती महाराष्ट्राचा मानबिंदू बनलेली आहे.” अशा आशयाचे उदगार प्रसिद्ध व ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर, कोल्हापूर यांनी काढले. “इचलकरंजी नगरीला वस्त्रोद्योग आणि संगीत परंपरेप्रमाणेच उत्तम अशी नाट्य परंपरा आहे. इचलकरंजीकर नाटक मंडळीने पूर्वी देशभरात आपली कला उत्तमरित्या सादर केल्याचा इतिहास आहे” असा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २७व्या मनोरंजन करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उदघाटन पाहुणे व परीक्षकांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर रावबा गजमल मुंबई, रविंद्र इनामदार सातारा आणि गौरी लोंढे पुणे हे जाणकार रंगकर्मी परीक्षक या नात्याने उपस्थित होते. यावेळी मर्दा फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त शामसुंदर मर्दा यांच्या हस्ते पाहुण्यांना व परीक्षकांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते मसाप इचलकरंजी शाखेच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे, नाट्य परिषद इचलकरंजी शाखेचे उपाध्यक्ष राजन मुठाणे, रंगकर्मी प्रकाश रावळ यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक संतोष आबाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व सूत्रसंचालन केले. संजीवनी कदम हिने परीक्षकांचा परिचय करून दिला. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या सदरच्या कार्यक्रमासाठी इचलकरंजी व परिसरातील तसेच सांगली, कोल्हापूर व सातारा येथील प्रेक्षक आणि निमंत्रित उपस्थित होते.


Leave a Reply