कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. काल रात्रीपासून जोरदार सरी सुरू असून, शहरात सकाळपासून मधूनमधून हलक्या सरींचा अनुभव आला. मात्र, धरण क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये पडलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, दिवसभरात तब्बल अडीच फूट भर पडली आहे. सकाळी १८ फूट असलेली पातळी रात्रीपर्यंत २० फूट ६ इंचांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे राजाराम बंधाऱ्यासह दूधगंगा आणि वारणा नद्यांवरील एकूण आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, कोदे, कासारी, धामणी या धरण क्षेत्रांत जोरदार पावसाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नद्यांमधील प्रवाहात वेगाने वाढ होत आहे.
राधानगरी धरण सध्या ९६ टक्के भरले असून, आता फक्त दोन फूट पाण्याची वाढ बाकी आहे. आज सकाळीपर्यंत धरण परिसरात ५४ मिमी पाऊस पडला, तर दिवसभरात अजून २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे साठ्यातील पाणी वाढत असून, स्वयंचलित दरवाजे उघडण्यासाठी अवघी दोन फूट उणीव आहे.
काळम्मावाडी धरणाची स्थितीही सुधारली असून, सांडव्यापर्यंत अर्धा मीटर पाण्याची कमतरता राहिलेली आहे. सध्या ते १९.५० टीएमसी भरलेले आहे.
आलमट्टी धरणात ८०.९३ टक्के जलसाठा असून, तेथून ४२,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरण ७२.८१ टक्क्यांपर्यंत भरले असून, सध्या तेथून ११,४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
पावसामुळे एका घराची भिंत कोसळल्याने सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आजअखेर ४१४ मालमत्तांना एकूण १ कोटी ५१ लाख १५ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील परळे-निनाई परिसरातील कडवी मध्यम प्रकल्प आज पहाटे ६ वाजता पूर्ण क्षमतेने भरला. गेल्या चोवीस तासांत या धरण क्षेत्रात ५४ मिमी पाऊस पडला आहे. २.५१ टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या ७१.२४० दलघमी पाणीसाठा असून, याचा उपयोग परिसरातील २२ गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.
पंचगंगेच्या पातळीत अडीच फुटांची वाढ; राधानगरी धरण ९६ टक्क्यांवर..

Leave a Reply