कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवस शांत असलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. विशेषतः कालपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कुंभी, घटप्रभा, पाटगाव, कासारी, धामणी, कोदे आदी धरण क्षेत्रात ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी सकाळी १८ फूट असून, रात्रीच्या सुमारास ही पातळी २० फूट सहा इंचांवर पोहोचली. राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील इतर आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. विशेषतः दूधगंगा नदीवरील एक आणि वरणा नदीवरील दोन बंधारेही जलमय झाले आहेत.
म्हाताऱ्या पावसाचे नक्षत्र संपून पाच दिवस लोटले असतानाही पावसाचा जोर दिसून आला नव्हता. मात्र काल रात्रीपासून अचानक हवामानात बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातही सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सतत कोसळत आहेत. यामुळे गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे.
राधानगरी येथील लक्ष्मी तलाव (राधानगरी धरण) पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे प्रशासनाने रात्री दहा वाजता स्वयंचलित दरवाजे उघडले. ८,३५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सोडण्यात आला आहे. यामुळे पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज सायंकाळी धरण ९९ टक्क्यांपेक्षा अधिक भरले होते. केवळ अर्धा फूट पाणी पातळीत कमी होते. पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढल्याने रात्री दहा वाजून एक मिनिटांनी क्रमांक तीन, तर त्यानंतर वीस मिनिटांनी क्रमांक सहाचा दरवाजा उघडण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्यावर्षीदेखील २५ जुलैलाच धरण भरून दरवाजे खुले करण्यात आले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ; राधानगरी धरणाचे दरवाजे खुले..

Leave a Reply