निधन : ८ फेब्रुवारी,१९२७
मिरजे जवळच्या बेडग येथे हिंदुस्थानी संगीत परंपरेतील एक थोर, प्रतिभावंत गायक, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म झाला.त्यांचे घराणे पौरोहित्य करणारे होते. त्यांचे वडील रामभट,यांनी पौरोहित्य सोडून साताऱ्याचे बाळाजीबुवा यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. आपल्या मुलानेही गाणे शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्यांचे चुलते विष्णुभट यांच्याकडे पौरोहित्य शिकण्यासाठी पाठविण्यात आले. त्यांना पौरोहित्य करण्यात गोडी नसल्यामुळे गायन शिकण्यासाठी ते वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडून बाहेर पडले. नंतर वडीलही वारले.
फिरत फिरत ते धार येथे देवजीबुवांकडे गाणे शिकण्यास राहिले . तीन वर्षे त्यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर गुरुपत्नीच्या त्रासामुळे ते धार सोडून गाणे शिकण्यासाठी ग्वाल्हेरला गेले. तेथील हस्सूखाँचे शिष्य वासुदेवराव जोशी यांच्याकडे ते गायन शिकण्यास गेले .प्रथम वासुदेवबुवांनी गाणे शिकवण्यास नकार दिला. पण पुढे एक वर्षाने बनारस येथे त्यांनी बाळकृष्णबुवांना शिकविण्याचे कबूल करून, पुढे सहा वर्षे चांगले शिक्षण दिले.
बाळकृष्णबुवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आले. काही दिवस मुंबईस राहून ते सातारा-औंधकडे वळले. त्यांना दम्याचा विकार जडला. मिरज संस्थानचे अधिपति बाळासाहेब पटवर्धन यांनी औषधोपचार करवून त्यांचा दमा पूर्णपणे बरा केला व दरबार-गवई म्हणून त्यांची नेमणूक केली. त्या नंतर दहा – बारा वर्षांनी ते श्रीमंत बाबासाहेब घोपरडे, इचलकरंजीकर यांच्याकडे जवळजवळ ३० वर्षे दरबार-गवई म्हणून राहिले. पं. बाळकृष्णबुवा यशस्वी गायक होते. त्यांची गायकी साधी, निर्मळ, भारदस्त व सौंदर्यपूर्ण होती. खास ग्वाल्हेर गायकीचा प्रचार महाराष्ट्रात बाळकृष्णबुवांनीच केला. मिरज आणि इचलकरंजी येथे त्यांचेकडे पुष्कळ लोक शिकू लागले.
बाळकृष्णबुवांच्या आधीही महाराष्ट्रात ख्याल गायकी रूढ होतीच; पण तिच्या विस्तृत प्रमाणावरील प्रसाराचे श्रेय बाळकृष्णबुवांनाच दिले जाते.
त्यांच्या दोन शिष्य-शाखा आहेत.
पहिल्या शाखेत पं. विष्णू दिगंबर पलुस्कर व त्यांच्या गांधर्व महाविद्यालयातून शिकून तयार झालेले विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव व शंकरराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर, वामनराव पाध्ये, प्रा.बी.आर. देवधर इ. नामवंत गवयांचा समावेश होता.
दुसऱ्या शाखेत मिराशीबुवा, अनंत मनोहर जोशी, त्यांचे चिरंजीव गजाननराव, तसेच शिष्य बापूराव गोखले व त्यांचे शिष्य राजारामबुवा पराडकर इ. प्रसिद्ध गवयांचा अंतर्भाव होतो.
त्यांचे चिरंजीव तरुण, सिद्धहस्त गायक अण्णाबुवा यांचे निधन झाले. या घटनेचा त्यांच्यावर जबरदस्त आघात होऊन पं. बाळकृष्णबुवा यांचे इचलकरंजी येथे निधन झाले.
संगितातील ‘भीष्माचार्य’, ‘गायनाचार्य’ ह्या पदव्या रसिकांनी त्यांना स्वेच्छेने बहाल केल्या.
प.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांना विनम्र अभिवादन.

Leave a Reply