राज्यातील जनतेसाठी आणि विशेषतः शिवप्रेमींसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील एक अशा एकूण १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (World Heritage List) करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली असून, हे किल्ले ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ (Outstanding Universal Value) मानून यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले आहे. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
हे सर्व किल्ले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचा व टिकवणुकीचा महत्त्वपूर्ण भाग होते. शत्रूपासून रक्षणासाठी आणि युद्धकौशल्यासाठी खास पद्धतीने बांधलेले “माची स्थापत्य” या किल्ल्यांचं वैशिष्ट्य आहे. हे माची स्थापत्य म्हणजे किल्ल्याचा असा भाग जो शत्रूच्या नजरेत न येता संरक्षण आणि आक्रमण दोन्ही करता येतो – आणि अशा प्रकारचं स्थापत्य जगातील इतर कोणत्याही किल्ल्यात आढळत नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास आभार मानले आहेत. त्यांनी या संकल्पनेसाठी पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारचाही सक्रीय सहभाग मिळवून दिला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) आणि संस्कृती मंत्रालय यांचाही या यशात मोठा वाटा आहे.
या प्रक्रियेसाठी फडणवीस यांनी अनेक देशांतील राजदूतांशी थेट संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही वेळोवेळी सहकार्य केलं. मंत्री आशिष शेलार यांनी युनेस्कोच्या महासंचालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केलं. त्यांच्या बरोबर अपर मुख्य सचिव विकास खारगे, युनेस्कोतील भारताचे राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व संचालनालयाचे हेमंत दळवी यांनीही मोलाची भूमिका बजावली.
या सामूहिक प्रयत्नातून अखेर हा ऐतिहासिक क्षण साकार झाला आहे. या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले आता जागतिक स्तरावर ओळखले जातील, हे राज्यासाठी, देशासाठी आणि शिवभक्तांसाठी अभिमानास्पद ठरेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचं मन:पूर्वक अभिनंदन केलं आहे..