वॉशिंग्टन – भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे ‘अॅक्सिओम-4’ मिशन यशस्वी ठरले असून, आता ते त्यांच्या पूर्ण चमूसह पृथ्वीवर परत येण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आज (मंगळवार) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे अंतराळयान पृथ्वीवर लँड होण्याची शक्यता आहे.
या मोहिमेतील चारही अंतराळवीर 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) दाखल झाले होते. परतीच्या प्रवासाआधी, पायलट शुभांशू शुक्ला, कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे अंतराळतज्ज्ञ स्लावोज उजनांस्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे सर्वजण ‘ड्रॅगन ग्रेस’ या अंतराळयानात गेले आणि त्यांच्या पृथ्वीवरील सुमारे 23 तासांच्या प्रवासासाठी आवश्यक अशी अंतराळसूट परिधान केली. सोमवारी संध्याकाळी 4.45 वाजता त्यांनी ISS मधील हार्मनी मॉड्यूलमधून अनडॉकिंगची प्रक्रिया पूर्ण केली.
ड्रॅगन यानाच्या ISS पासून वेगळ्या होण्याच्या प्रक्रियेनंतर त्याच्या इंजिनद्वारे योग्य अंतर निर्माण करण्यात आले. यान पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरण्यापूर्वी ‘हिट शिल्ड’ लावले जाणार असून, हे शिल्ड सुमारे 1600 अंश सेल्सियस तापमानाचा सामना करेल.
लँडिंग प्रक्रिया कशी असेल?
शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ड्रॅगन यानाचे लँडिंग पॅराशूटच्या साहाय्याने होईल. यान 5.7 किमी उंचीवर पोहोचल्यावर प्रारंभीचा पॅराशूट उघडेल आणि त्यानंतर 2 किमी उंचीवर मुख्य पॅराशूट कार्यान्वित होईल. यामुळे यानाचा वेग कमी होऊन ते हळूहळू खाली येईल. अंतिमतः, यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यांवर उतरेल आणि तेथून विशेष जहाजाद्वारे परत नेले जाईल.
महत्त्वाची बाब म्हणजे…
या परतीच्या मोहिमेदरम्यान, NASA च्या महत्त्वाच्या हार्डवेअरबरोबरच 60 हून अधिक प्रयोगांमधून संकलित करण्यात आलेल्या डेटाचाही समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, ड्रॅगन ग्रेस यानाचे हॅच पूर्णपणे बंद करण्यात आले असून, क्रू सदस्यांनी कक्षीय प्रयोगशाळेपासून वेगळे होण्यापूर्वी अंतिम तपासणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
शुभांशू शुक्ला यांचा पृथ्वीमार्गे प्रवास सुरू; आज दुपारी आगमनाची शक्यता..









Leave a Reply