गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय समोर आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी मूर्तींच्या समुद्रात व नैसर्गिक जलप्रवाहांतील विसर्जनास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. परिणामी, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा अशा सर्व प्रमुख मंडळांच्या पारंपरिक विसर्जन मिरवणुकीच्या परंपरेला आता कोणताही अडथळा राहिलेला नाही.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे सार्वजनिक मंडळांचा मोठा पेच सुटला असून, विसर्जनासाठी पर्यायी सोयी उपलब्ध नसल्यामुळे समुद्रात विसर्जन आवश्यक असल्याचं सरकारने न्यायालयात स्पष्ट केलं. हे आदेश केवळ यंदाच्या गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून येणाऱ्या नवरात्रोत्सव, अन्य उत्सव आणि मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठीही लागू राहणार आहेत.
सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे की, पाच फुटांपर्यंतच्या घरगुती मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक राहील. तसेच, समुद्रात विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यासाठी खास एजन्सी नियुक्त केल्या जातील, अशी माहितीही देण्यात आली आहे.
मुख्य न्यायमूर्ती आलोक आढे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली असून, पर्यावरणाच्या दृष्टीने सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कठोर उपाययोजना राबवाव्यात असे निर्देशही दिले आहेत. मूर्ती तयार करताना पर्यावरणपूरक रंग वापरणे, विसर्जनानंतर उरलेल्या सामग्रीचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्चक्रण करण्यावर भर देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मूर्तीकार, सार्वजनिक मंडळे आणि भाविकांनी समाधान व्यक्त केलं आहे. शतकाहून अधिक जुन्या परंपरेला न्याय मिळाल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहात पार पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
मोठी बातमी : पीओपी मूर्ती विसर्जनावरून मोठा निर्णय, न्यायालयाने दिली परंपरेला मान्यता..

Leave a Reply