कोल्हापूर | प्रतिनिधी विशेष : राज्याच्या विधिमंडळाच्या परिसरात शुक्रवारी जे काही घडले, त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हादरून गेले आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकाराची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली असून, याप्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना केवळ एक अपवाद नव्हे, तर गेल्या काही काळात राजकारणात वाढलेला उद्दामपणा आणि असंवेदनशीलतेचं प्रतिबिंब आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद आता त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला असून, या हाणामारीत दोन्ही गटांचे कार्यकर्ते सहभागी होते. दोन्ही आमदारांचा राजकीय इतिहास, वक्तव्यांची शैली आणि आक्रमकतेची पातळी पाहता, हे प्रकरण अचानक भडकलेलं नाही, तर मागील वाद आणि व्यक्तिगत टोकाची टीका याचे हे परिणाम म्हणावे लागतील.
विशेष बाब म्हणजे, विधानभवनासारख्या उच्च सुरक्षेच्या ठिकाणी हे कार्यकर्ते पोहोचलेच कसे? त्यांना प्रवेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. काही कार्यकर्त्यांकडे अधिकृत पास नसल्याचंही उघड झालं आहे.
गोपीचंद पडळकर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली असली, तरी त्यांच्या आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर आधीपासूनच काही गुन्हे नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे “अज्ञानतावशात कार्यकर्त्यांकडून चूक झाली” असे म्हणणे टाळले पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात दोन्ही आमदारांना लिखित समज देणे आणि कार्यकर्त्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी करणे आवश्यक आहे.
या घटनेवर राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींनी या घटनेची निंदा केली आहे. मात्र, गृहखातं आपल्या अखत्यारीत असतानाही, फडणवीस यांनी याप्रकरणाची चौकशी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात सोपवली आहे.
राज्याच्या राजकारणाचा चेहरा आणि भाषा दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पूर्वी आमदारांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांचा गराडा असायचा, आज मात्र त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा शिरकाव झालेला दिसतो. त्यामुळेच अशा घटनांना थांबवण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे.
राज्य विधिमंडळाच्या इतिहासात यापूर्वीही काही धक्कादायक घटना घडल्या आहेत. ४५ वर्षांपूर्वी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना एका आमदाराने सभागृहात दुसऱ्या आमदाराला उचलून जमिनीवर आपटल्याचा प्रसंग आजही लोकांच्या लक्षात आहे. मात्र, त्या वेळी अध्यक्षांनी कठोर भूमिका घेतली होती. आजही तसेच निर्णायक पाऊल उचलणे गरजेचे आहे..
विधानभवनातील हाणामारी : पडळकर आणि आव्हाड यांच्या वादाचा स्फोट?

Leave a Reply