एकटा ‘जड्डू’ इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अडला – लढाई हरली, पण मनं जिंकली

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगलेल्या सामन्याचा शेवट भारतीय चाहत्यांसाठी हृदयद्रावक ठरला. 193 धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अवघ्या 170 धावांवर गारद झाला. या पराभवाचा सर्वाधिक क्लेश मोहम्मद सिराजच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता — मैदानावर बसून बॅटवर हात आदळत त्याचा संताप व्यक्त करत होता. तर दुसऱ्या टोकाला, रवींद्र जडेजा शांतपणे आणि निराशेने मान खाली घालून उभा होता.

जडेजाने या सामन्यात केवळ फलंदाजीच नाही, तर संयम, चिकाटी आणि लढवय्या वृत्तीचंही दर्शन घडवलं. 181 चेंडूत 61 धावांची लढवय्या खेळी करत त्याने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. जवळपास 35 षटके तिघांनी मिळून इंग्लंडच्या गोलंदाजांना थोपवले. मात्र शेवटी सिराज बाद झाला आणि भारताचं स्वप्न अधुरं राहिलं.

सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये भारतीय संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी आपल्या भाषणात जडेजाच्या खेळीचं मनापासून कौतुक केलं. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या “The MVP ft. Ravindra Jadeja” या व्हिडीओत गंभीर म्हणतो, “ही एक जबरदस्त लढाई होती. जड्डूने जे काही केलं, त्याला मी सलाम करतो.”

जरी काही माजी खेळाडूंनी आणि चाहत्यांनी जडेजावर शेवटी मोठे फटके खेळायला हवे होते, अशी टीका केली, तरी गंभीर आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्या खेळातील समज, संयम आणि प्रयत्नांचे कौतुकच केले.

या सामन्यात भारताने केवळ 22 धावांनी पराभव पत्करला, पण जडेजाच्या खेळीने एक गोष्ट स्पष्ट केली – सामना जिंकण्यासाठी प्रत्येक वेळेस मोठी खेळी आवश्यक नसते, तर योग्य वेळी दिलेला संयम आणि लढवय्या वृत्ती अधिक मोलाची ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *