लंडन – इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला असून, यजमान इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. या लढतीत भारताने ६३ अवांतर धावा दिल्या. ही बाब कर्णधार शुभमन गिल यांनी विशेष लक्षात घेत सांगितली. त्यांच्या मते, या अवांतर धावांमुळे सामना भारताच्या हातून निसटला.
गिल म्हणाले, “छोट्या चुका जरी वाटत असल्या तरी त्यांचा परिणाम मोठ्या पराभवात होतो. पहिल्या सामन्यात झेल गमावले आणि आता या सामन्यात अवांतर धावांनी नुकसान झालं. चेंडू स्विंग होतो म्हणून झेल टिपणं कठीण ठरतं, पण अचूक झेप घेणं आणि योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे.”
एकाच सत्रात निर्णायक घडामोडी
तीनही सामन्यांमध्ये एका सत्राने चित्र बदललं. ज्या सत्रात भारताची पकड होती, तिथेच अधिक गडबड झाली. दुसऱ्या कसोटीत खेळात सातत्य राखता आलं नाही. मुख्य गोलंदाजांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती, ती राहिली नाही. गिल म्हणाले, “पहिल्या डावात ऋषभ पंत धावबाद झाला तो निर्णायक क्षण होता. के. एल. राहुलच्या शतकाच्या विचारांमुळे त्या क्षणी धाव घेणं धोकादायक ठरलं.”
लढवय्या वृत्तीचा अभिमान
दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने केलेल्या लढवय्या प्रयत्नाचं गिल यांनी विशेष कौतुक केलं. “जडेजा हा जगातील सर्वात विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या कामगिरीमुळे आम्हाला दुसऱ्या डावात सावरण्याची संधी मिळाली. जर १०-१५ धावा कमी दिल्या असत्या, तर सामना वेगळा झाला असता,” असंही ते म्हणाले.
शेवटी, गिल यांनी सांगितलं की पराभव जरी झाला असला, तरी संघातील खेळाडूंनी दाखवलेली झुंज समाधानकारक वाटते. “दुःख नक्कीच आहे, पण खेळाडूंची जिद्द आणि प्रयत्न यांचा अभिमान वाटतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
लॉर्ड्स कसोटीत भारताचा पराभव; अपयशामागे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील त्रुटी – शुभमन गिल

Leave a Reply