चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल, शुबमन गिलने नाणेफेकीवर दिली प्रतिक्रिया…

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे रंगत असून, भारतीय संघाने यावेळी संघ रचनेत तीन बदल करत नव्या शक्यतांना संधी दिली आहे. मँचेस्टरच्या मैदानावर भारताला यापूर्वी कधीच विजय मिळवता आलेला नाही. त्यातच चौथ्यांदा सलग नाणेफेक गमावल्यामुळे भारताला पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.

तिसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना केल्यानंतर संघ व्यवस्थापनाने संघात आवश्यक बदल केले आहेत. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या करुण नायरला या सामन्यासाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, त्यांच्या जागी युवा फलंदाज साई सुदर्शनचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, दुखापतीमुळे आकाश दीप आणि नितीश कुमार रेड्डी यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी शार्दुल ठाकुर आणि अंशुल कंबोज संघात आले आहेत.

हरियाणाचा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याचे हे कसोटी पदार्पण असून, १९९० नंतर मँचेस्टरमध्ये कसोटी पदार्पण करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, अनिल कुंबळे यानेदेखील त्याच मैदानावर आपले कसोटी पदार्पण केले होते आणि कंबोजप्रमाणेच प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये १० बळींची कामगिरी केली होती.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “मी खरंच गोंधळलो होतो. नाणेफेक हरल्यामुळे काहीसं बरंही झालं. मागील सामन्यांमध्ये आमची खेळी प्रभावी होती. काही क्षण आम्ही गमावले, पण एकूण सत्रांमध्ये आम्ही वर्चस्व राखलं. आम्हाला थोडा विश्रांतीचा कालावधी हवा होता, जो आता मिळालाय. संघाच्या रचनेत केलेले बदल गरजेचे होते.”

दरम्यान, करुण नायरच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या निवडीबाबत आधीपासूनच चर्चा होती. आता त्याच्या संघाबाहेर जाण्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दुसरीकडे, चांगली कामगिरी करूनही कुलदीप यादवला पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने काहींच्या भुवया उंचावल्या आहेत.

आता या नव्या संघरचनेनुसार भारत कसोटी मालिका वाचवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *